सांदन दरी

                                              सांधणची घळ/दरी 

                                                  सांदन घळ

                   
 
काशा  फोटो  व्हिडीओ


सांदन घळ ही महाराष्ट्रातील अकोले तालुक्याच्या परिसरात, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेली दरी-घळ आहे.











निसर्गाची किमया आणि नारळात पाणी असे आपण अनेकदा म्हणत आलोय. किंबहुना प्रत्येक वेळी मी नारळपाणी पिताना एकदा तरी असे म्हणालो आहे. 
पण असाच निसर्गाचा चमत्कार विराट रुपात अनुभवायचा असेल तर एकच ठिकाण समोर येते. ते म्हणजे सांधण/सांदण दरी. एका अतिप्राचीन जिओग्राफिक 
फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ म्हणजे निसर्गातले एक आश्चर्यच आहे. तिथे पोचण्यासाठी अहमदनगर 
जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)
-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठी कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोचता येते. नाशिकहूनही घोटीमार्गे पोचता येईल. 
हा परिसर सह्याद्रीच्या अनेकविध शिखरांनी भरलेला (भटक्यांसाठी भारलेला) आहे. कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, आजोबा, अलंग-मदन-कुलंग ही
 ट्रेकर्सची आव्हाने याच परिसरात आहेत.

एकदा भंडारदरा धरणाचे गाव शेंडीला पोचले की डाव्या हाताला जाणारा घाटघरचा रस्ता पकडून एमटीडीसीच्या समोरुन पुढे निघाले की "कळसूबाई-हरिश्चंद्रगड 

अभयारण्य" असा फलक आपले स्वागत करतो. एकंदरच हा अकोले-राजूर-भंडारदरा हा परिसर बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहेच. अर्ध्या-पाऊण तासातच गाडी
 उडदावणे गावाशी येते.




उजवीकडे अलंग-मदन-कुलंगची अक्राळविक्राळ रांग लक्ष वेधून घेते. पावसाळ्याच्या आसपास ढग उगाचच त्या उत्तुंग कड्याशी लगट करत असतात. 

त्यापुढे रस्ता थोडा खराब आहे आणि घाटघर धरणाच्या दिशेला वाटचाल करुन अगदी धरणाच्या भिंतीशी लगट करुन रस्ता पुढे साम्रद फाट्यावरुन 
आतमध्ये वळतो. अगदी गावाच्या शाळेजवळ गाडी पोचते. तिथे गाडी पार्क करुन कुणीतरी वाटाड्या घेऊन घळीकडे निघावे. गावापासून मागे अगदी
 माळरानातून एक पायवाट सांधनात जाते. डावीकडे वर रतनगड आणि त्याचा खुट्टा लक्षवेधी आहे. मागे अलंग-मदन-कुलंग- कळसूबाई ही सह्याद्रीची 
सर्वांगसुंदर रांग आपल्याला कवेत घेतल्याचा भास करुन देते. साधारण अर्ध्या तासाची ही वाट मन अगदी प्रसन्न करुन टाकते. अगदी घळीच्या मुखाशी 
येइपर्यंत इथे काही असेल याची कल्पनाच येत नाही. मुख अतिशय दाट झाडीत झाकले गेले आहे. फक्त एक-दोन रुळलेल्या पायवाटा 
मुखाशी जातात.



मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंदरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय 

केलेली दिसते. ते अमृतासमान पाणी पिऊन आतापर्यंतचा थकवा कुठल्याकुठे पळून जाईल. एक टप्पा उतरुन खाली आले आणि समोर जे काही दिसते 
त्याचे वर्णन शब्दांत शक्यच नाही. अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही 
बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा. मनावर दडपण येणे साहजिकच. यालाच थ्रिल म्हणत
 असावेत बहुतेक. आतपर्यंत ऊन पोचणे शक्यच नाही, अतिशय थंडगार वातावरण. एकदोन ठिकाणी उन्हाळ्यातही गुढगाभर पाणी असते. तेही एकदम थंडगार 
गोठवणारे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते. अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे. त्यानंतर समोर जो काही विराट
 कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते. एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ
 घाटाचा कडा. पावसाळ्यात उत्साहाने फुसांडणारे मुबलक धबधबे आणि त्यांची चंदेरी नक्षी.



असा हा विराट सह्याद्री डोळ्यांत साठवूनच परत फिरावे, आपापला सगळा कचरा आपल्या बरोबर घेऊनच. परत येताना पुन्हा घाटघर-उडदावणे मार्गे न जाता रतनवाडी 

मार्गे भंडारदरा जलाशयाला प्रदक्षिणा घालून शेंडीला पोचावे. वाटेत रतनवाडीच्या अमृतेश्वराचे अप्रतिम हेमाडपंथी मंदिर चुकवू नये असेच आहे. 


उपयुक्त माहिती:
  • रस्ते:
  1. पुणे-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद-रतनवाडी-परत शेंडी (भंडारदरा).
  2. मुंबई-कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद-रतनवाडी-परत शेंडी (भंडारदरा).
  3. नाशिक-घोटी-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद-रतनवाडी-परत शेंडी (भंडारदरा).
  4. मुक्काम आणि जेवणाची सोय:
  5. साम्रद किंवा भंडारदरा (शेंडी).
  • आसपासचा परिसर:
  1. रंधा धबधबा
  2. अलंग-मदन-कुलंग दुर्ग
  3. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, रतनगड
  4. कळसूबाई शिखर
  5. करुळ घाट
टिप्स: 
सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.
मुक्कामाची आणि जेवणाची सोय साम्रद गावात होऊ शकते. तसेच भंडारदरा (शेंडी) मध्ये एमटीडीसीचे सुंदर रिसॉर्ट आहे.
साम्रदवरुन वाटाड्या अवश्य घेऊन जावा.
दोन दिवस हाताशी असतील तर सांधण दरीला जोडून रतनगडाच्या ट्रेकचाही बेत करता येईल.

सांदन घळ



सांदन घळ

No comments:

Post a Comment